गणेशोत्सव एक दिवसावर येऊन ठेपला आहे.यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरा करण्यावर भर असणार आहे.विसर्जनासाठी विहिरींच्या साफसफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. विसर्जन विहिरींची साफसफाई व इतर तयारीवर यंदा महानगरपालिकेद्वारे 44 लाखांचा खर्च होत आहे.
दरवर्षी शहरात 11 विहिरींमध्ये गणेश विसर्जन केले जाते. गणेश उत्सवाआधी मनपा द्वारे या विहिरींची सफाई केली जाते. यंदाही हे काम हाती घेण्यात आले आहे. विहिरींची सफाई सोबतच त्यालगत असलेल्या रस्त्यांवर मुरुम टाकून डागडुजी केली जाते. 11 विहिरींच्या सफाईचे काम 44 लाखांमध्ये देण्यात आले आहे. लवकरच हे काम पूर्ण होईल. सततच्या पावसामुळे शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या आधी रस्त्यांवरील खड्डे बुजवून पॅचवर्कचे काम करण्यात येते. मात्र यंदा महापालिकेने हे टेंडर काढलेले नाही.गणेशोत्सवावर देखील निर्बंध लादले आहेत. यावर्षी मिरवणूक काढण्यात येणार नाही. यामुळेच खड्डे देखील बुजवण्यात मनपाने दुर्लक्ष केले.